Wednesday, April 18, 2012

अगा मज ज्ञाना भेटला

फाटक उघडून दादा अंगणात आले. माझी खोली फाटकाला लागूनच असल्यानं मलाच ते पहिले दिसले. अंगणात आल्या आल्या त्यांनी वाकून प्राजक्ताची काही फुलं उचलली. "दादा आणि फुलं?" मी मनातल्या मनात विचार करत हॉलचं दार उघडून अंगणात आलो. "हे बघ कोण आलं आहे माझ्याबरोबर" त्यांच्याबरोबर आलेल्या एका पोरसवदा इसमाकडे बोट दाखवत दादा म्हणाले. २०-२१ वर्षाचा, बारीकसा तो मुलगा, खेड्यातली जरा शिकलेली मुलं घालतात तशी विजार आणि न खोचलेला फुल बाह्यांचा चौकड्याचा शर्ट घालून आला होता. केस खांद्यापर्यंत वाढलेले पण व्यवस्थित विंचरलेले होते. खांद्यावर झोळी वजा थैली, पायात सध्या चपला अशा अवतारातल्या त्या मुलाने मला फाटकामधूनच नमस्कार केला. दादांनी नोकरी लावायच्या उद्देशानं गावावरून कोणालातरी आणलं आहे असं समजून मी "नाही, मी नाही ओळखलं" अशा अर्थी मान हलवली.
"अरे हा ज्ञाना! मांनी खास तुला भेटवण्यासाठी पाठवलं आहे". मला काही कळायच्या आत त्याने माझ्या जवळ येत "नमस्कार, मी ज्ञानदेव विठ्ठल कुलकर्णी" असे म्हणत माझ्या कानाशिलांवर त्याचे दोन्ही कृश हात ठेवले आणि माझ्या माथ्याला आपला माथा भिडवला.
क्षणभरात माझ्या सर्व अंगात कंप भरला, डोळ्यासमोर प्रकाशाची वलय चमकली, भोवती सर्व विश्व फेर धरून नाचू लागलं... जंगलात आई वडिलांना शोधणारी मुलं दिसली... लोकांनी मारलेले दगड दिसले...उपाशी पोटी तळमळत काढलेल्या रात्री दिसल्या...गळ्यात नाग घातलेला योगी दिसला... भावानं दिलेली दीक्षा दिसली...पैठणची काटेरी वाट दिसली... पाठीवर भाजलेले मांडे दिसले...वेद वदनारा रेडा दिसला...चालणारी भिंत दिसली...दिव्य तेजानं चालणारा बोरू दिसला...आणि शेवटी समाधीचं बंद होणारं दार दिसलं. वयाच्या एकविसाव्या वर्षी योगी समाधिस्त झाला.

वर्षत सकळमंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी, भेटतु भूतां

झोपेतून जागा झालो तेव्हा हृदयात काहिली माजलेली. मन मात्र शांत प्रसन्न होतं. डोळ्यातून घळा घळा पाणी वाहू लागलं आणि मी "सुखिया झालो"!

No comments:

Post a Comment