Thursday, August 5, 2010

ती गेली तेव्हा...

ती गेली तेव्हा रिमझिम, पाऊस निनादत होता
मेघांत अडकली किरणे, हा सूर्य सोडवित होता

ती आई होती म्हणूनी, घनव्याकूळ मी ही रडलो
त्यावेळी वारा सावध, पाचोळा उडवित होता

अंगणात गमले मजला, संपले बालपण माझे
खिडकीवर धुरकट तेव्हा, कंदील एकटा होता.

... कवी ग्रेस यांची ही सुंदर कविता! उन्हाळ्यातल्या एका सूर्यास्थाच्यावेळी गच्चीवर बसून एकटाच गुणगुणत असतांना मला अचानक ही कविता भेटली. "सापडली" या अर्थाने नाही तर एखादा मित्र खूप दिवसांनी भेटला तर जसा कडकडून भेटतो तशी ही कविता मला भेटली. दूरवर क्षितिजाजवळ उडत असलेली धूळ, मावळत चाललेला सूर्य आणि पसरत चाललेला अंधार माझ्या छातीत हुरहूर निर्माण करत होते आणि तशात हे गाणं!

तो प्रसंग काही माझ्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण नव्हता पण तरी तो अविस्मरणीय ठरला. इतका कि तो परत अनुभवावा असा अयशस्वी प्रयत्न मी पुन्हा बऱ्याचदा केला.

आज तो प्रसंग आठवला कारण आज कवी ग्रेस यांचा वाढदिवस. पण मी आज या महान कवी बद्दल नाही बोलणार आहे. मला आज बोलावस वाटतंय ते अशा काही हुरहूर लावणाऱ्या प्रसंगांबद्दल, जे आपण कधीच विसरत नाही. ते फार आनंदी प्रसंग असतात किंवा खूप दु:खी , अस काही नाही. पण ते अशी अनामिक अनुभूती देऊन जातात कि विसरता विसरत नाहीत.

लहानपणी एकदा आई बरोबर सांगलीमध्ये बाजारात गेलो होतो. आई साडी घेत होती आणि मी दुकानाच्या पायरीवर उभा राहून आजूबाजूचा बाजार बघत होतो. संध्याकाळची वेळ असल्यामुळे रस्त्यावरच्या सगळ्या दुकानदारांचा माल संपत आला होता. तिथेच रस्त्याच्या कडेला एक जख्खड म्हातारी आजी जांभळे विकत होती. बहुतेक तिच्या डोळ्यात मोतीबिंदू झाले असावेत. तिची जांभळे तिच्यासारखीच म्हातारी होती. म्हणूनंच कि काय, संध्याकाळ झाली तरी तिची जांभळाची टोपली तुडुंब भरलेलीच होती. कोणीही गिऱ्हाईक तिच्याकडे फिरकत ही नव्हत. थकल्या पाणावल्या डोळ्यांनी ती निर्विकारपणे आपल्या जांभळावरची दिसणारी माशी हाकलत होती. तिचे ते वय , त्या वयातली धडपड आणि ते निर्विकार पाणावलेले डोळे आजही माझ्या मनात बेचैनी निर्माण करतात. आई कडे हट्ट करून मी ती जांभळ घेतली. वाटल कि तिला थोडी मदत होईल, पण त्या म्हाताऱ्या आजीच्या डोळ्यातील शून्य स्तब्धता आजही मला गहिवर आणते.

कवी ग्रेसांच्या या अशा कविता ऐकल्या कि अशा अनेक प्रसंगांची मालिकाच डोळ्यासमोर येते. कधी निवांत वेळ मिळाला तर अशा घटना आठवा ज्या आयुष्याच्या जमा खर्चाच्या हिशेब वहीत नोंदवता येत नाहीत पण प्रत्येक निवांत क्षणावर ठसा उमटवून जातात.